Friday, October 7, 2011

पोस्टातली गुंतवणूक



पोस्ट म्हणजे सर्वसामान्यांचे गुंतवणुकीचे हक्काचे व्यासपीठ. आता हे पोस्ट खातेही कात टाकणार असून, पोस्टाची बँक होणार आहे. अर्थात पोस्टाचे प्रत्यक्ष बँकिंग रूप अवतरायला आणखी किमान २ वर्षे लागतील. पोस्टाच्या माध्यमातून राबविल्या जाणार्‍या अल्प बचत योजना भक्कमपणे पाय रोवून उभ्या आहेत. नेमक्या कोणत्या योजना पोस्टातर्फे राबविण्यात येतात, त्याबाबत काही टिप्स.. 
■ पोस्ट खात्याने केवळ टपाल साहित्याच्या विक्रीपुरतेच आपले क्षेत्र र्मयादित न ठेवता बँकेसारखी सेवा द्यावी आणि हे खाते व्यवसायाभिमुख बनवावे, अशी ब्रिटिशांची योजना होती.
■ साधा, सोपा फॉर्म, स्थानिक पातळीवरच सर्व व्यवहार, नामांकनाची सोय, अशा सोयी-सुविधांमुळे अल्प बचतीच्या योजना स्वत:चे वेगळे स्थान राखून आहेत.
■ या योजनांसाठी सरकारने अधिकृत अल्प बचत एजंट नेमले आहेत.
■ बचत बँक खात्याबरोबरच मासिक प्राप्ती योजना (एम.आय.एस.), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (एन.एस.सी.), किसान विकास पत्र (के.व्ही.पी.), आवर्त ठेव (आर.डी.), मुदत ठेव योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पी.पी.एफ.), वरिष्ठ नागरिक बचत योजना (एस.सी.एस.एस.) यांचा प्रामुख्याने अल्प बचत योजनांत समावेश होतो.
■ मासिक प्राप्ती योजना (एम.आय.एस.) : एकरकमी पैसे गुंतवून दरमहा व्याजाच्या पाने उत्पन्न मिळविण्यासाठी ही योजना आहे. विशेषत: स्वेच्छानिवृत्ती किंवा निवृत्ती घेणार्‍या व्यक्तींच्या दृष्टीने ही योजना फायद्याची आहे.
■ ठेवीची किमान रक्कम दीड हजार असून, त्यानंतर दीड हजाराच्या पटीत रक्कम गुंतवणे व्याजाच्या दृष्टीने सोईचे पडते. एका (सिंगल) नावावर कमाल साडेचार लाख रुपये, तर दोघांच्या (संयुक्त) नावावर नऊ लाख रुपये ठेवता येतात. आठ टक्के व्याज आहे.
■ व्याज दरमहा रोख स्वरूपात मिळत असल्याने गुंतवणूकदारांची सोय होते.
■ ज्यांना दरमहा व्याज काढून घ्यायचे नसेल, त्यांना त्याच पोस्टात बचत बँक (सेव्हिंग) खाते उघडून, त्यात या योजनेचे व्याज परस्पर जमा करून घेता येते.
■ मुदतीअंती मिळणारा बोनस आणि दरमहा मिळणारे व्याज लक्षात घेता या योजनेवरील व्याजदर नऊ टक्क्यांपर्यंत जातो. विशेष म्हणजे यातून मिळणार्‍या व्याजातून करकपात (टी.डी.एस.) केली जात नाही.
■ मुदतीपूर्वीही पैसे मिळण्याची सोय यात ठेवण्यात आलेली आहे, पण पूर्ण सहा वर्षे पैसे ठेवले, तरच पाच टक्के बोनस मिळतो.