Tuesday, September 6, 2011

पॅनकार्ड बाबतची A, B, C, D.....


कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा आपली आर्थिक ओळख म्हणून पॅनकार्ड ही आता एक अत्यावश्यक बाब झाली आहे. मुख्य म्हणजे, पॅनकार्डसाठी वयाची अट नसल्याने ते मायनर मुलाचे अथवा मुलीचे पॅनकार्ड काढणेही शक्य आहे. पॅनकार्ड काढण्याची सुविधा आता सर्वत्र उपलब्धझाल्याने ते काढलेले नसल्यास काढणे फायद्याचे आहे. विशेष म्हणजे, अर्ज केल्यापासून केवळ १५ दिवसांत स्पीड पोस्टाने पॅनकार्ड घरपोच येते. पॅनकार्ड कसे काढावे, कुठे काढावे याबाबत या काही टिप्स.. 
■ सरकारच्या आयकर विभागाने प्रत्येकाला दिलेले हे एकमेव ओळखपत्र आहे.
■ प्रत्येकाचा पॅन क्रमांक वेगवेगळा असतो.
■ एका क्रमांकाचे दोन पॅन असणार नाहीत.
■ या कार्डावर सुरुवातीला एक नंबर असतो. तोच 'पॅन नंबर!'
■ त्याखाली कार्डधारकाचे संपूर्ण नाव असते.
■ त्याखाली वडिलांचे संपूर्ण नाव असते आणि कार्डधारकाची जन्मतारीख नमूद केलेली असते.
■ कार्डधारकाचे छायाचित्र आणि स्वाक्षरी असते.
■ पॅनकार्ड आयकर आयुक्त यांच्या सहीने देण्यात आलेले असते.
■ हे कार्ड म्हणजे त्या व्यक्तीची खात्रीची ओळख आहे.
■ हे कार्ड कुठेही ओळख म्हणून दाखवता येते आणि ही ओळख स्वीकारार्ह असते.
पॅनसाठी कोठे अर्ज करावा?
पॅनसंबंधी सेवा अधिक सुधारण्यासाठी प्राप्तिकर खात्याने यूटीआय इन्व्हेस्टर सर्व्हिसेस लि. (यूटीआयआयएसएल) यांना जेथे प्राप्तिकर खात्याचे कार्यालय आहे, अशा सर्व शहरांमध्ये आयटी पॅन सेवा केंद्रे उभारण्यास आणि व्यवस्थापित करण्यास तसेच नॅशनल सिक्युरिटीज् डिपॉझिटरी लि. (एनएसडीएल) यांना पॅन देण्यास अधिकृत मान्यता दिलेली आहे.
पॅनसाठी कसा अर्ज करावा?
पॅनसाठी अर्ज केवळ अर्ज '४९ अ'मध्येच करता येतो. हा पॅन अर्ज प्राप्तिकर खात्याच्या किंवा यूटीआयआयएसएलच्या किंवा एनएसडीएलच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करता येतो, किंवा त्याची छायाप्रतही वापरता येते.
तुम्ही एका शहरातून दुसर्‍या शहरात राहण्यास गेलात किंवा तुमची बदली झाली तर तुम्हाला पॅनसाठी अर्ज करावा लागेल का?
परमनंट अकाउंट नंबर (पॅन) त्याच्या नावाप्रमाणेच कायमस्वरूपी क्रमांक असतो आणि तो पॅनधारकाच्या आयुष्यभरात बदलत नाही. पत्ता किंवा शहर बदलल्याने मूल्यांकन अधिकारी कदाचित बदलेल. म्हणूनच, जवळच्या आयटी पॅन सेवा केंद्र किंवा टिन सेवा केंद्राला कळवावे लागेल. जेणेकरून प्राप्तिकर खात्याच्या पॅन डाटाबेसमध्ये आवश्यक ते बदल करता येतील.
प्राप्तिकर खात्याने मला पॅनकार्ड जारी केलेले आहे, मी नवीन न फाटणारे पॅनकार्ड मिळवू शकतो का?
नवीन न फाटणारे पॅनकार्ड मिळविण्यासाठी, नव्या पॅनकार्डासाठी आणि / किंवा पॅनच्या माहितीतील बदलांसाठी विनंतीसाठी अर्ज सादर करावा लागेल. ज्यामध्ये सध्याच्या पॅनचा उल्लेख करावा लागेल आणि जुने पॅनकार्ड परत करावे लागेल. ६0 रुपये अधिक लागू होणारा सेवाकर भरावे लागतील.
पॅनसाठी अर्ज इंटरनेटद्वारे करता येतो का?
होय. नवीन पॅन मिळविण्यासाठी इंटरनेटद्वारे अर्ज करता येतो. शिवाय पॅनच्या माहितीमध्ये बदल किंवा सुधार करण्यासाठी आणि सध्या अस्तित्वात असलेल्या पॅनसाठी नवे पॅनकार्ड मिळविण्यासाठी देखील इंटरनेटद्वारे विनंती करता येते.
तत्काळ पॅन कसा मिळवावा?
जर पॅन मिळविण्यासाठी इंटरनेटद्वारे अर्ज केलेला असेल आणि शुल्क नामांकित क्रेडिट कार्डद्वारे भरले असेल, तर पॅन प्राधान्यक्रमाने दिला जातो आणि ईमेलद्वारे कळवला जातो.

No comments:

Post a Comment